गझल
कुणाच्या आठवाने हे तळे भरताच नयनांचे
बुडाया लागले इमले तसे आताच स्वप्नांचे
खुळ्या वेड्या कळीला त्या कसे माहीत हे नाही
असे आयुष्य तिजला फक्त येथे औट घटकांचे
तुला ही मस्करी वाटे मला झाली सजा येथे
तुझ्या एकाच वदने टोचले मज बाण शब्दांचे
खुळी मी हासले तेव्हा मला माहीत हे नाही
कसे एका क्षणाने बंध जुळले सात जन्मांचे
कशी गाफील मी होते सुखाच्या त्या क्षणी तेव्हा
कुणी घेऊन गेले अर्थ माझ्या आर्त भावांचे
- डिके
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा