*फ्लाईंग स्काॅड क्रं- १

मित्रांनो नमस्कार आजपासून मी एक नवी लेखमाला घेऊन येत आहे. "फ्लाईंग स्काॅड क्रं- १" मला या युनिटमध्ये काम करत असताना आलेले अनुभव मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आशा आहे आपणाला या घटनांचा आस्वाद घेता येईल...हे लेख मी प्रत्येक मंगळवारी सादर करणार आहे. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे लेख कसा
वाटला ते कमेंट्स द्वारे कळवा.

*फ्लाईंग स्काॅड क्रं- १*


*श्रीगणेशा*
          २४ ऑगस्टपासून २००३ मी भरारीपथक क्रंमांक- 1 या पदाचा कार्यभार स्विकारला. सोबत अर्थात "नारायणराव जगदाळे" खरंतर! त्यांच्यामुळेच मी इथे आलो होतो. आमचे निरिक्षक होते "सुरेशजी नागरे" (हल्लीच ते दिवंगत झाले) एकदम उमदा माणूस. सुरवातीस आमच्यात कम्युनिकेशन गॅप होती. पण जशी जशी कामं होत गेली ती कमी होत गेली. 

          ‌आम्ही तिघं पहिल्यांदाच एकत्र येत होतो. जगदाळे साहेबांना भरारी पथकाचा अनुभव होता. मी तर अगदीच कोरा करकरीत होतो. मला माझ्या कामाचा श्रीगणेशा करायचा होता. लवकरच ती वेळ आली एका संध्याकाळी मोहिमेवर जायचे ठरले. 

         जगदाळे साहेब कधीच कोणतीही बातमी लिक करत नव्हते. सुरवातीस ते मलाही सांगत नव्हते त्यांना माहीत होतं मी किती एक्साईट होतो ते. त्यांना कोणत्याही प्रकारे बातमी लिक व्हायला नको होती. माझं काम होत 'वेट एन्ड वाॅच' माझ्यासाठी जणू ती शिकवणीच होती. "गाडीत बसा रे" जगदाळे साहेबांची ऑर्डर झाली. बाहेर दोन गाड्या होत्या. एक सरकारी, दुसरी भाड्याची,दुस-या गाडीसाठी एक ड्रायव्हर खास बोलावला होता. तो गाडी चेसींग करण्यात माहिर होता. मला सरकारी गाडीत बसायला सांगितले. मी, वाहनचालक रविंद्र गुु जाधव आणि दोन सिनियर हवालदार गुरव,सुतार, आणि शैलेश शिंदे तो ही नवीनच होता. आम्ही निघालो.

         हाय वे च्या आधी गाडी थांबली जगदाळे साहेब आमच्या गाडी जवळ आले आणि म्हणाले "तुम्ही या गल्लीत गाडी ठेवा मी बोलावल्या शिवाय बाहेर यायचं नाही" ते दुसरी गाडी घेउन निघून गेले. रवि मला हसत म्हणाला "साहेब तुम्हाला कळलं ना आपण लिंबूटिंबू आहोत" मी थोडासा नरवस होतो. रविने ते ओळखले तो म्हणाला "सर ही पहिलीच वेळ आहे, तुम्हाला अनुभव नाही म्हणून नंतर तुम्हाला पण काम करायचच आहे" 

         थोड्याच वेळात जगदाळे साहेबांचा फोन आला. रविने गाडी सुरू केली जगदाळे साहेब म्हणाले "गाडी येत आहे तुम्ही तयार रहा पण मी बोलावल्या शिवाय गाडी बाहेर आणायची नाही" रविने गाडी परत बंद केली. मन बेचैन होतं उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एक बरं होतं रवि सोबत होता. तो असला की आपण काहीच बोलायचं नसतं. त्याला बोलायची खूप आवड, तो त्याचे काही जुने किस्से सांगत होता. मधेच मी ऐकतोय की नाही याची खात्री करत होता. एवढ्यात परत फोन आला. 
"आम्ही गाडीचा पाठलाग करत आहोत" मी म्हणालो "आम्ही येऊ का?" तर ते म्हणाले 
"नको" थोड्या वेळाने त्यांचा परत फोन आला 
"अरे तो गाडीवाला आम्हाला चकवून पळाला तुम्ही या बाहेर" 
आम्ही नर्वस मिशन फेल. आम्ही बाहेर आलो. सगळे उभे होते तिथे गेलो. 
"हिरव्या रंगाची फियाट होती, डार्क हिरवा चटणी कलर" जगदाळे साहेब बोलत होते. 
"कुठल्या बाजूला गेला?" 
"इथून सरळ गेला पार्ला सर्कलला त्याने आम्हाला चकवलं. मी म्हणालो 
"आम्ही जाऊन बघूका?" 
 "तू जाऊन काय करणार? तो काय थांबलाय तुझ्यासाठी?" 
 "जाऊन तर बघतो" 
"बरं ठीक आहे जा पण लवकर या आम्ही इथेच थांबतो" "चल रवी" आम्ही सरळ निघालो, 
पार्ला सर्कललला आलो मी म्हणालो 
"चल रवी यू टर्न मार" रविने यू टर्न मारला.
 "हळू घे" मी म्हणालो एक एक गल्ली जात होती. मला एका गल्लीत कुणी तरी लपल्याचा भास झाला. मी ओरडलो "थांब" रविने अर्जंट ब्रेक दाबला 
"काय झालं" 
"रिव्हर्स घे" रविने गाडी रिव्हर्स घेतली. 
"ह्या गल्लीत टाक" गाडी गल्लीत टाकताच पहिलीच गाडी हिरव्या रंगाची होती. मी म्हणालो 
"शैल्या चेक कर" शैल्या म्हणजे शैलेश शिंदे खाली उतरला. त्याने दरवाजा उघडला आणि तो ओरडला 
"सर पोटले" ( टायरच्या रबरी ट्यूब, ज्यात दारू भरलेली असते, त्याला पोटला म्हणतात.) 

       आम्ही उतरलो गाडीतर मिळाली पण मी पाहिलेली हालचाल, मी हातात काठी घेतली आणि एकटाच पुढे गेलो. गाड्या रांगेत पार्क केल्या होत्या. एक गाडी गेली, दुसरी गेली, तिस-या गाडी खाली एक जण लपलेला होता. मी काठी आपटली 
"चल बाहेर आ" तो आधीच ओरडत होता 
"सर मै मालवाला हू मुझे मत मारो" चला आरोपीही मिळाला. त्याला घेतला आणि गाडीत बसवला. शैलेश त्याच्या सोबत बसला रविने तिथेच मला कडक सल्यूट मारला. तो म्हणाला 
"सर मानलं तुम्हाला, आम्ही एवढी लोक होतो पण जे आम्हाला दिसलं नाही ते तुम्हाला दिसलं, तुमची नजर साॅलीड आहे" मी जगदाळे साहेबांना फोन केला
 "सर गाडी मिळाली"
 "काय" ते समोरून ओरडले. 
"अरे वा! "आरोपी?" मी म्हणालो
 "एक आरोपी आहे" 
"अरे वा ये ये लवकर" आम्ही अंधेरी हायवेला आलो. सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं. जगदाळे साहेब पुढे आले शेकहँड केला आणि म्हणाले 
"अभिनंदन चल चांगली सुरुवात झाली, गुड बिगीनिंग इज हाफ डन, ऑल दी बेस्ट" रवि माझ्याकडे बघून हसत होता मी म्हणालो "काय झालं?" तो म्हणाला "मी तुम्हाला मघाशी लिंबूटिंबू म्हणालो त्याचं हसू आलं" जगदाळे साहेबांच्या चेह-यावरील समाधान पाहून मला बरं वाटलं....अशा प्रकारे माझ्या कामाचा श्रीगणेशा जोरात झाला होता.
क्रमशः
- दीपक म कांबळी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गझल