दिवाळी
दीवाळी २१ ऑक्टोबर २०२२
चाळ संस्कृतीत दीवाळीला फार महत्त्व होते. पंधरा दिवस आधीच दीवाळीच्या फराळाची तयारी सुरू व्हायची. प्रत्येक घरात एक दिवस ठरलेला असायचा. सगळ्या गृहिणी त्या दिवशी त्या घरात फराळाच्या मदतीसाठी जायच्या. मग त्यांचं चहापाणी तिथेच असायचं आणि नेमकं त्याचवेळी आम्ही तिथे टपकायचो. संपुर्ण गल्लीत फराळाचा सुवास दरवळायचा.
दीवाळीच्या दीवसात नळावरची भांडणंही बंद व्हायची तिथे आज कुणाच्या घरी जायचं हीच चर्चा असायची. त्यावेळी निसर्गही सुंदर असायचा. गोड गुलाबी थंडी पडायची. आम्हाला दीवाळीची सुट्टी असायची. अख्खा दिवस गच्चीत पतंग उडवायचो. खबर काढून नाश्त्याला योग्य ठिकाणी हजर व्हायचो. किती छान दिवस असायचे ते.
दादा लोकं बांबू तासून कंदील बनवायला घ्यायचे तिथे छोटी मोठी मदत करायला जायचो. काय एकेकाची कलाकारी असायची. सुंदर रंगसंगतीचे कागद, विलक्षण नक्षीकाम, एकंदरीत ख-या अर्थाने दीवाळी असायची. तो रेडीमेडचा जमाना नव्हता. एक एक महिना आधी टेलरला कपडे आणि माप दिलं जायचं. तरी दीवाळीच्या आदल्या दिवशीच कपडे मिळायचे. सकाळी लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करणे, धावत जाऊन पहिले फटाके वाजवणे. हीच खरी गंमत असायची. कारेटं फोडल्यानंतर त्याची कडू चव चाखायची. त्यावर गोड बेसनाचा लाडू कोंबायचा आणि धुम ठोकायची. कारण पहिला फटाका कोण फोडणार ही शर्यत असायची. अगदी मजेचे दीवस होते.
हळुहळु मोठे झालो घराची जबाबदारी आली. पाठीवर दोन भावंडे होती. मग दिवाळी त्यांच्यासाठीच झाली. वडील लवकर गेलेले घरात एकटी आई. माझ्या पगारावर घर अवलंबून असायचे. त्यावेळी म्हणजे १९८२ -८३ चा काळ आम्हाला २००/- रूपये फेस्टिवल ॲडव्हान्स मिळायचा. ते महिन्याला २०/- असे दहा महिन्यांत कापून घेतले जायचे. त्यावर लहान बहिण आणि भाऊ, आई यांची खरेदी व्हायची आणि उरलेल्या पैशातून फाऊंटनच्या फुटपाथवरील कपड्यात माझी खरेदी व्हायची. मला आठवतंय लहान असताना मी नोकरीला लागलो की दररोज नवीन शर्ट घालून ऑफिसमध्ये जाईन वगैरे अशा गप्पा असायच्या पण प्रत्यक्षात तसे कधीच झाले नाही. हळुहळु परिस्थिती बदलली. भावंडे मोठी झाली. माझं लग्न झालं. भावंडांचीही लग्ने झाली. आता कांबळी परिवार वाढलाय या दीवाळीला काही दिवसांचा नातूही घरी आहे. आयुष्यात सगळं काही मिळतं. तुमच्यात ते मिळवण्याची जिद्द मात्र असायला हवी आणि ते मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. बाकी स्वामी समर्थ पाठीशी आहेतच.
शुभं दिपावली!
- दीपक कांबळी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा