क्रांतिनगर उत्सव समिती भाग - २

क्रांतिनगर उत्सव समिती.               ४ नोव्हेंबर २०२२

भाग दोन

         ‌ज्यांनी आधीचा होळीचा लेख वाचला नसेल त्यांनी आधी तो लेख वाचावा म्हणजे त्यांना लिंक लक्षात येईल. तर मार्च महिन्यात होळी साजरी करण्यात आल्यानंतर आम्हाला वेध असायचे ते शिवजयंती या उत्सवाचे. ३ दिवस हा उत्सव अगदी उत्साहाने साजरा केला जायचा. एप्रिल किंवा मे महिन्यात शिवजयंती असायची. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी पडलेली असायची. त्यामुळे संपूर्ण दिवस वाडीत हुंदडता यायचे. डेकोरेशन, लाईट याची जबाबदारी अर्थातच आप्पा बोरकर यांची. त्यांना मदत करायला बरीच पोरं असायची. काही चुकलं तर आप्पा चष्म्याच्या वरून रागाने बघायचा पोरं घाबरली की स्वतःच हसायचा. आप्पा म्हणजे एकदम जिंदादिल माणूस. 

         हा उत्सव ३ दिवसांचा असायचा मुख्य म्हणजे या उत्सवात स्पर्धा असायच्या अगदी चमचा लिंबू बादलीत चेंडू टाकणे वगैरे पासून आंतरचाळ रस्सी खेच स्पर्धे पर्यंत. कब्बडी, क्रिकेट, या आंतरचाळ स्पर्धा तसेच सिंगल विकेट ही क्रिकेटची वय्यत्तिक स्पर्धा. महिलांची संगीत खुर्ची, मेणबत्या पेटवणे वगैरे ब-याच स्पर्धा असायच्या. 

           सतिश घोगळे, आबा नांदिवडेकर, सदा मुळगावकर, वगैरे बरीच सिनियर मंडळी या स्पर्धा घ्यायची. नंतर कॅरमची सुद्धा स्पर्धा सुरू झाली. दरवेळेस काही नवीन प्रयोग केले जायचे. काही वेळा नेमबाजीची सुद्धा स्पर्धा मी पाहिली होती. 

            लहान असतांना काही जणांना जिंकताना पाहण्यात पण मजा यायची. उदा. टांगलेला पाव खाणे या स्पर्धेत विद्याधर साळवी हा नेहमीच अग्रेसर असायचा. नंतर शेखर कदम सुद्धा ही स्पर्धा जिंकायचा. कॅरम स्पर्धेत विजय कांबळी हा चॅम्पियन असायचा. मी एकदा सेमीफायनलला हेमंत सागवेकर बरोबर २-१ ने पराभूत झालो होतो. आठ बोर्डचे ३ गेम असायचे. पहिला गेममध्ये मी हेमंतला सहज हरवलं होतं पण नंतरचे सलग दोन गेम तो जिंकला होता. हेमंत फार छान खेळायचा. 

            क्रिकेट हा माझा आवडता गेम. आमची इलेवन गोल्डन ही आमची टीम होती. राजू धुरी, विलास दळी, वसंत मोरे, किशोर सावंत, मुळे, सुरेंद्र बागलकर, बंड्या खेडेकर, समेळ,हेमंत सुर्वे,पराग सुर्वे, गणेश मांडलेकर, संजय दळी, सुनील दांडेकर, रेडकर, कोटकर,नरेश शिंदे अशी बरीच मुले वाडीत क्रिकेट खेळायची. आंतरचाळ क्रिकेट स्पर्धेत आय जे के हा आमचा संघ होता. बरेच वेळा आम्ही अंतिम फेरीत प्रवेश घ्यायचो आणि काही वेळा जिंकलो‌ सुद्धा होतों. तसेच सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत मी नेहमीच सेमीफायनल पर्यंत पोहचायचो. एकदा मी रनर अपचे बक्षीस सुद्धा घेतले होते संजय दळी बरोबर फायनलला मी हरलो होतो. संजय दळी हा डावखुरा फलंदाज होता. त्याचा ॲडव्हानटेज त्याला चांगला मिळायचा. त्याने सतत ३ वर्षे ती फायनल मारली होती. 

            सांघीक स्पर्धेत सगळ्यात मजेशीर स्पर्धा म्हणजे रस्सीखेच स्पर्धा. या स्पर्धेत एन मधले विचारे बंधू हे खास आकर्षण असायचे, कारण ते तिघंही पेहलवान होते. बहुतेक तेच ही स्पर्धा जिंकायचे. एकदा ए बी सी ने उसाच्या गुर्हाळातले कामगार स्पर्धेत उतरवून ही स्पर्धा जिंकली होती. शेवटच्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा असायची व त्यादिवशी बक्षीस समारंभ आयोजित केला जायचा. समोर संपूर्ण भरलेल्या प्रेक्षकां समोर बक्षीस घेण्यात एक वेगळाच आनंद असायचा. 

             या सगळ्यांवर कडी म्हणजे रात्री पडद्यावर दाखवण्यात येणारे चित्रपट. ते पाहायला फारच मजा होती. यहुदी, श्री ४२०, पाठलाग,खोटे सिक्के, वगैरे बरेच चित्रपट आम्ही तेव्हा पाहिले होते. चटई किंवा सतरंजी अंथरून लोकं खाली बसायची. जागा पकडण्यासाठी लवकर येऊन बसायला लागायचं. चित्रपट सुरू असताना मध्येच उगीचच कुणी उंदीर उंदीर म्हणून उठायचं मग मागे सगळी पळापळ व्हायची. ही सगळी गंमत कालांतराने लोप पावत गेली. पुढे व्हिसीआर आले मग चाळीत वर्गणी काढून एका रात्रीत ३-३ चित्रपट पाहिले जायचे. 

               मला आठवतंय जेव्हा टीव्ही नविन आले होते तेव्हा मांगलवाडीत धुतपापेश्वर बिल्डिंग मध्ये आम्ही मुले छायागीत बघायला जायचो. पुढे घरा घरात टीव्ही आले मग ती मजा बंद झाली. 

                एकंदरीत आमच्या पिढीने या सगळ्या सणांचा आनंद पुरेपूर लुटला होता. आताही उत्सव होत असतील पण ती मजा काही औरच होती. चला तर मित्रांनो भेटुयात पुढच्या लेखात सगळ्यात महत्वाचा सण तो म्हणजे गोविंदा. 
क्रमशः
- दीपक मधुकर कांबळी

टिप्पण्या