पेपरवाला

 पेपरवाला


बरीच वर्षे पेपर घरी येतो पण पेपरवाला कोण आहे हे कधी पाहिलंच नव्हतं. पुर्वी महिना झाल्यावर बिल घ्यायला तरी पेपरवाले यायचे पण आता कंपनीवाले वर्षाचे पैसे एकदम घेऊन जातात. हल्ली पेपरची स्किम असते. आमच्याकडेही आहे. म्हणजे तेव्हा मुलगी होती तिच्यासाठी इंग्रजी पेपर आणि त्यावर मराठी पेपर फ्री अशी स्किम होती. आता मुलीचं लग्न झालं ती तिच्या घरी गेली. मी म्हंटल
"आता इंग्रजी पेपर कशाला बंद करूयात"
तर सौ म्हणतात
"असुद्यात इंग्रजी पेपर ची रद्दी खूप असते"
यावर मला हसताही येईना पण खरंय ते. इंग्रजी पेपर कसा जाडजूड असतो. शिवाय कागद आपल्याला लागतच असतो
कावळ्याच्या घास ठेवायला वगैरे. काय म्हणता 'अजून? असतो' म्हणजे असतोच. ती चाळीतली परंपरा आम्ही इथेही जपली आहे. मला आठवत लहानपणी पेपरचे चौकोनी तुकडे करून ठेवायचं काम माझ्याकडे होतं. 'कशाला?' अहो कशाला काय आमच्या आजोबांना आणि पणजीला तंबाखूची मिश्री लावायची सवय होती. स्टोवर तंबाखू भाजायला घेतला की आम्ही धूम पळायचो. असो!
तर या पेपरवाल्याला गाठायच ठरवलं पण जमतच नव्हतं. कारण सकाळी सात वाजता पाहिलं तरी पेपर दारात. अगदी साडेसहाला उठलो तरी पेपर दारात आणि यापेक्षा आधी उठायची काही डेरींग केली नाही. म्हणजे ते जमणार नाही हे माहितंच होतं. शेवटी कळलं की नाक्यावर कोपऱ्यात त्याचा पेपरचा स्टाॅल आहे. म्हंटल चला एकदा भेटुन तर बघुयात.
रविवारी सकाळी काहीतरी आणायचं होतं म्हणून पिशवी घेऊन बाहेर पडलो तेव्हा आठवणीने त्या स्टाॅलवर गेलो. माझी ओळख सांगायला गेलो तर तोच म्हणतो
"विजया २०२ ना"
मी चाट पडलो या गृहस्थाला मी कधी पाहिले नाही हा मला कसा ओळखतो?
त्याने बसायला खुर्ची दिली आणि
"ए दोन कटिंग सांग"
अशी ऑर्डरही दिली
मी म्हंटल "अरे कशाला"
"घ्या हो काका मला पण घ्यायचीच होती"
"बरं!"
माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बहुतेक त्याला दिसले होते
मग त्यानेच उत्तर दिले.
"काका मी तुमचा फेसबुक फ्रेंड आहे. मला तुमच्या बद्दल बरीच माहिती आहे. मलाही वाटायचं कधीतरी तुम्हाला भेटावं पण भिती वाटायची आधीच तुम्ही अधिकारी आणि मोठे कवी, लेखक, गीतकार, चित्रकार, काय काय तर तुम्ही माझ्याशी बोलाल की नाही? शिवाय पेपर टाकताना तुमचा दरवाजा नेहमी बंद. आज तुम्ही मला भेटायला आलात मला किती बरं वाटलं, बोला काय कंप्लेंट आहे?"
"नाही कंप्लेंट काहीच नाही"
"मग पेपर बंद करताय? काका असं नका करू त्या निमित्ताने रोज तुमच्या दारात येता येतं कधीतरी तुम्हाला भेटता येईल"
"नाही पेपर बंद करायचा नाही"
"हां मग ठिक आहे, मग काय काम होतं?"
"तुम्ही बोलायला दिलं तर सांगणार ना"
"हो हे खरंय" असं म्हणून त्याने दातात जिभ दाबली
"आल्यापासून मीच वेड्यासारखा बडबड करतोय काका तुम्ही बोला काय काम आहे?"
एवढ्यात चहा आला
"ए‌ चहा चांगला आणलास ना? आला मारके? तुला माहित आहे हे कोण आहेत?"
चहावाल्याने मला नखशिखांत पाहून घेतले आणि नाही म्हणून मान हलवली.
"अरे हे फार मोठे कवी आहेत"
चहावाल्याचा आणि कवितांचा काही संबंध नसावा.  कवी म्हणजे काय हे त्याच्या गावीच नसावे हे मला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण हा म्हणतोय म्हणजे कुणी तरी मोठा माणूस असावा असं वाटल्याने त्याने हातात ग्लास आणि किटली जराशी वर करून आणि मान झुकवून वंदन‌ केले आणि चेहऱ्यावर थोडंसं हास्य आणलं. चहाचे ग्लास आणि पैसे घेऊन तो निघून गेला.
"हा काका आता बोला काय काम होतं"
आता मला बोलायला संधी मिळाली होती पण माझं काम असं काहीच नव्हतं. मला फक्त पेपरवाला कोण आहे हेच पहायचं होतं. आता हा मला एवढा सन्मान देतोय तर काहीतरी बोलायलाच पाहिजे. एखाद्या कवीला एवढ्या तळागाळात सन्मान मिळू शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मानधन वाचवण्यासाठी दिलेल्या पुष्पगुच्छ आणि बेगडी शुभेच्छा पेक्षा हा सन्मान मला आनंद देऊन गेला. आता विचारायचं काय? पण काहीतरी विचारायचं म्हणून विचारले
"तुम्ही हा धंदा म्हणजे पेपरचा कधीपासून करता?" लहानपणापासून म्हणजे मी चौथी पाचवीत असेन‌ बहुतेक. त्याचं काय आहे काका माझ्या वडिलांपासून हे सुरू आहे. आता माझा मुलगा पाचवीत आहे. तो तुम्ही येण्यापुर्वी घरी गेला. त्याचं बॅडलक नाहीतर आज त्याची आणि तुमची भेट झाली असती. जाऊदे कधीतरी तो योग येईल. माझ्या आयुष्यात किती वर्षांनी हा योग आला. नाही का?"
"तुम्ही सकाळी किती वाजता उठता"
त्याला मधेच थांबवत मी प्रश्न केला. आपल्याला एकंदरीत बोलायची संधी कमी आहे हे माझ्या एव्हाना लक्षात आले होते.
"सकाळी चार वाजता मी आणि माझा मुलगा घराच्या बाहेर पडतो"
बापरे! चार वाजता? घड्याळात सकाळचे चार वाजलेले मी शेवटचे कधी पाहिले हे मी आठवायचा वायफळ प्रयत्न केला.
तो काही बोलायचा आधीच
"मुलगा सुद्धा?"
"हो मी पण माझ्या वडिलां सोबत असाच यायचो"
म्हणजे हा माणूस चौथीत असल्यापासून सकाळी चार वाजता उठतो आहे. मला याने मोठे म्हणावे याची मला आता शरम वाटू लागली होती.
"काही कमाई असते का हो या व्यवसायात"
"तशी खास कमाई नसते मी नोकरीही करतोय पण आजोबांच्या काळापासून जेवढे पेपर आम्ही टाकत आलो आहोत त्याघराशी आमचे ऋणानुबंध जुळले आहेत. दसरा, दिवाळीला लोक घरातल्या माणसांप्रमाणे फराळा बोलावतात. त्यांच्या घरच्या कार्यक्रमाचं आमंत्रण करतात. गेल्या वर्षी माझा मुलगा वार्षिक परिक्षेत पहिला आला तेव्हा एका गृहस्थाने त्याला नवीन सायकल बक्षीस म्हणून दिली.
" अरे पण एवढ्या वर्षात आपण कसे भेटलो नाही?"
"सर मला फार इच्छा होती पण तुमचा दरवाजा नेहमी बंद असायचा. आता दिवाळी जवळ आली आहे मी फराळ घेऊन आलो तर चालेल का? आमच्याकडील चकली फेमस आहे. सगळ्यांना आवडते. मी नक्की घेऊन येईन"
कुणीतरी सणसणीत चपराक द्यावी असं काही तरी वाटलं.
"नक्की या दिवाळीला. हा माझा मोबाईल नंबर. फोन करा येण्या आधी"
असे म्हणून मी निघालो तो ही अपराधी भावनेने.
गेले चाळीस ते पन्नास वर्षे हे कुटुंब ब-याच कुटुबांशी जोडले गेले आहे आणि त्यात आम्ही नव्हतो ही खंत होती.
- दीपक म कांबळी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गझल