अण्णा पानवाले

 अण्णा पानवाले


             क्रांतिनगर गिरगाव माझं जन्म स्थान. नुसतंच जन्मस्थानच नाही तर आयुष्यातली सुरवातीची पस्तीस वर्षे मी त्या चाळीत काढलीं. जगन्नाथ शंकरशेट रोडवरील या क्रांतिनगर मध्ये  "ए टू एन" अशा ८ चाळी होत्या सध्या मेट्रो प्रकल्पासाठी क्रांतिनगरचा डाव्या बाजूचा अर्धा भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे.

            मला आठवतंय क्रांतिनगरमध्ये आत शिरताना उजव्या बाजूला अण्णा पानवाल्यांची पानाची गादी होती. मी सुद्धा लहान असताना आजीची पान सुपारी, आजोबा आणि वडिलांच्या विडी सिगारेट घ्यायला त्यांच्याकडे जायचो. अगदी नाक्यावर दुकान असल्याने आत येणारा जाणारा माणूस अण्णांच्या नजरे समोरूनच जायचा. त्यामुळे कोण कधी येतो कधी जातो याची अलिखीत दस्त नोंदणी अण्णांकडे असायची. कधी कुणी लहान मुल ( मोठे सुद्धा) हरवलं तर त्याला कधी किती वाजता आणि कोणाबरोबर बाहेर जाताना पाहिले हे अण्णांकडूनच समजायचं.

            पुढे मोठा झाल्यावर त्या गादीवर जायचा काही संबंध नव्हता. वडील लवकर गेलेले. आजोबा डोंबिवलीत काकांकडे रहायला गेलेले आणि आजीची बत्तिशी रिटायर्ड झालेली त्यामुळे तिचं पान खाणं बंद झालेलं. तेव्हा अण्णांकडे जाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. पण बाहेर पडताना किंवा आत शिरताना जर अण्णांच लक्ष असेल तर हात दाखवणं सुरू होतं.

       पुढे मी नोकरीला लागलो. नंतर माझं लग्न झाल्यावर क्रांतिनगर मधील खोली छोटा भाऊ मनोजच्या नावावर करून मी रहायला चिंचपोकळी येथे गेलो होतो. आई कधी माझ्याकडे व जास्त मनोजकडेच असायची त्यामुळे क्रांतिनगरला येणं जाणं होतंच. तशात माझी मुलगी 'सेंट टेरेसा' या शाळेत असल्यामुळे सकाळी तिला सोडायला शाळेत जायचं आणि संध्याकाळी तिला न्यायला क्रांतिनगरमध्ये यायचं हे नित्याचच झालं होतं.

              पुढे मला प्रमोशन मिळाल्यावर कधीतरी मी युनिफॉर्म मध्ये आईला भेटायला यायचो. त्यामुळे गल्लीतील रहिवाशांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. काही बुजुर्ग मंडळी तसे बोलूनही दाखवत. तर अशात एकदा मला अण्णांनी हाक मारली.
"दीपक"
मी जरा थबकलोच कारण गल्लीत शिरताना मी जरासा वेगातच शिरायचो.
"काय अण्णा?"
"काही नाही रे खूप दिवस वाटत होतं तुझ्याशी बोलावं"
"काय अण्णा मग हाक मारायची ना"
"तसं नाही रे पण नेहमी तू घाईतच असतोस म्हंटल उगाच तुला राग नको यायला"
"अण्णा हे जरा अती होतंय हा"
अण्णा नुसतं हसले.
"बरं बोला काय काम आहे"
"अरे माझं काय काम असणार? मला आपलं एवढंच सांगायचंय की मला तुझा अभिमान वाटतो.
याच गल्लीतील अंगा खांद्यावर खेळवलेली  पोरं व्यसनाच्या अधीन जाऊन अकाली मृत्यू पावली. कुणी पोलिसांच्या एन्काऊंटर मध्ये गेली की फार वाईट वाटतं"
अण्णांच्या डोळ्यात खरंच पाणी होतं. मी सुद्धा गहिवरलो होतो.
"पण तुला पाहिलं की बरं वाटतं. याच गल्लीत राहून तू आमचं नाव काढलंस. आम्ही अभिमानाने लोकांना सांगतो की सगळं क्रांतिनगर वाईट नाही काही संस्कार पण महत्वाचे असतात. ते इथं राहून तू आणि तुझ्या भावानं सिद्ध केलंय. तू आता इथे रहात नाहीस पण तुझ्या भावावर तू चांगले संस्कार केलेस. तूच बिघडला असतास तर तुझा भाऊ पण त्याच मार्गाने गेला असता. संस्कार मी का म्हणतो की माझ्याकडे आपल्या बापासाठी सिगारेट घ्यायला येणारी मुले जेव्हा स्वतःसाठी माझ्याकडे सिगरेट मागतात तेव्हा काळजात धस्स होतं. त्यांना सिगारेट द्यायला हात थरथरतो. एकदा एका पोराला म्हणालो अरे हे वय आहे का तुझं तर वस्सकन अंगावर ओरडला 'ए थेरडया आपलं काम कर आणि एवढंच वाईट वाटत असेल तर दुकान बंद कर आणि वारीला जा'. अरे मी पोटापाण्यासाठी हा धंदा केला माझ्या दोन मुलांना चांगलं शिकवलं. तू सुद्धा आपल्या बापासाठी आज्यासाठी सिगारेट आणायला यायचास तेव्हा मला भिती वाटायची पण तू तसा कधी वागला नाहीस मला खरंच तुझा अभिमान आहे"
"अण्णा आता काळ बदलतोय. पोरं चांगली शिकतायत. तुम्ही काळजी करू नका एकदिवस तुमच्या दुकानात कोणीच येणार नाही. तुम्हाला तुमचं दुकान बंद करावं लागेल"
मी असं म्हणताच तो माळकरी बाबा हसला आणि म्हणाला
"पोरा तुझे बोल खरे ठरोत पांडुरंगा शप्पथ मी आनंदाने माझं दुकान बंद करीन"
आज अण्णा नाहीत पण त्यांची आठवण येते. अण्णांच दुकान आता बंद आहे. तिथे इस्त्री वाला आला आहे. पण मी म्हणालो तसं बंद झालं आहे का?????
- दीपक कांबळी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गझल